गिरमेवस्ती शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी;!
दोन विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत
‘मिशन शिष्यवृत्ती आरंभ’ ठरले यशस्वी
कोपरगाव: साधनसंपन्नतेचा अभाव असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश कसे मिळवता येते, याचे उत्तम उदाहरण कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गिरमेवस्ती (जेऊर कुंभारी) येथील विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे. या शाळेच्या इयत्ता पाचवीतील दोन विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा २०२५ मध्ये घवघवीत यश मिळवत जिल्हा गुणवत्ता यादीत आपले स्थान पटकावले आहे. त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीने शाळेचे आणि गावाचे नाव तालुक्यात उज्वल झाले आहे.
कु. श्रावणी सुमित चव्हाण हिने २३६ गुण (७९%) मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत २९१ वा क्रमांक पटकावला, तर साई संजय वक्ते याने २३४ गुण (७८%) मिळवून ३२६ वा क्रमांक संपादन केला.
या अभूतपूर्व यशामागे अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 'मिशन शिष्यवृत्ती आरंभ' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा सिंहाचा वाटा आहे. या उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरीपासूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची पद्धतशीर आणि पायाभूत तयारी करून घेण्यात आली. कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी मा. शबाना शेख मॅडम, विस्तार अधिकारी - शेवंता पुजारी मॅडम तसेच चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रावसाहेब लांडे सर यांचे विद्यार्थ्यांना वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
या विद्यार्थ्यांच्या यशात त्यांच्या स्वतःच्या अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी, पालकांचे खंबीर सहकार्य आणि शाळेतील शिक्षकांचे अविरत परिश्रम यांचा मोठा वाटा आहे. मुख्याध्यापिका श्रीमती प्रियंका जोशी, श्री. अनुजकुमार ढुमने आणि वर्गशिक्षक श्री. सुदाम साळुंके यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे आणि प्रभावी मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन करता आले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी मा. शबाना शेख मॅडम, विस्तार अधिकारी - शेवंता पुजारी मॅडम आणि केंद्रप्रमुख श्री. रावसाहेब लांडे सर यांनीही अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या प्रेरणादायी कामगिरीबद्दल ग्रामपंचायत जेऊर कुंभारीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्य, सर्व शिक्षकवृंद व पालक यांनी दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
ग्रामीण भागातील आणि मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या शाळेने मिळवलेले हे यश निश्चितच इतर विद्यार्थ्यांना आणि शाळांना भविष्यात अधिक चांगले प्रदर्शन करण्यासाठी प्रेरणा देईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment